काँग्रेसचे कमलनाथ ‘कमळ’ हाती घेणार? मुलगा नकुलसह अनेक आमदार पक्ष सोडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 05:30 AM2024-02-18T05:30:30+5:302024-02-18T05:32:07+5:30

भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भातील ही प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती. कमलनाथ यांनी त्यांच्या जवळच्या नेत्यांचेही सर्वेक्षणे करून घेतली होती.

Former Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath, his son MP Nakul Nath and many MLAs are reported to be joining the BJP soon | काँग्रेसचे कमलनाथ ‘कमळ’ हाती घेणार? मुलगा नकुलसह अनेक आमदार पक्ष सोडण्याची शक्यता

काँग्रेसचे कमलनाथ ‘कमळ’ हाती घेणार? मुलगा नकुलसह अनेक आमदार पक्ष सोडण्याची शक्यता

आदेश रावल

नवी दिल्ली :काँग्रेसमध्ये पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, त्यांचे पुत्र खासदार नकुल नाथ यांच्यासह अनेक आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भातील ही प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती. कमलनाथ यांनी त्यांच्या जवळच्या नेत्यांचेही सर्वेक्षणे करून घेतली होती. जेणेकरून भाजपच्या तिकिटावर त्यांचे कोणते नेते निवडणूक जिंकू शकतात, हे त्यातून समजू शकेल. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनाच कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्यात आले होते. कमलनाथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होताच, पक्ष नेतृत्वाने क्षणाचाही विलंब न करता कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले व जितू पटवारी यांची मध्य प्रदेशात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ छिंदवाडामधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत, असे त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. त्यामुळे लवकरच कमलनाथ व मुलगा नकुल आणि त्यांच्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१९८४ च्या शीख विरोधी दंगल प्रकरणीही कमलनाथ यांच्यावर ठपका होता. त्यामुळे त्यांना बराच काळ त्रास झाला. कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाबाबत काही दिवसांपूर्वीच अंतिम चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यसभा न मिळाल्याने नाराजी?

भोपाळ : कमलनाथ यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर होत होत्या, पण दुजोरा मिळाला नाही. कमलनाथ हे मध्यप्रदेशात आमदार आहेत आणि ते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांना वाटते की, त्यांना विरोध करणारे दिल्लीत काँग्रेस चालवत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. त्यामुळेही ते नाराज आहेत. कमलनाथ यांना राज्यसभेची एकमेव जागा मिळण्याची अपेक्षा होती. पण, ही जागा अशोक सिंह यांना मिळाली.

प्रोफाइलमधून काँग्रेस गायब

कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल नाथ यांनी एक्सवरुन प्रोफाइलमधून काँग्रेस हटविली. आता त्यांच्या प्रोफाइलवर एवढाच उल्लेख आहे की, ते छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथून संसद सदस्य आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांना त्यांचा ‘तिसरा मुलगा’ असे संबोधले होते. इंदिराजींचा तिसरा मुलगा भाजपमध्ये जाण्याचे तुम्ही स्वप्न पाहू शकता का?

- जीतू पटवारी, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस,

Web Title: Former Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath, his son MP Nakul Nath and many MLAs are reported to be joining the BJP soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.