माजी मंत्री आणि भंवरी हत्याकांडातील आरोपी महिपाल मदेरनाचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 10:55 AM2021-10-17T10:55:51+5:302021-10-17T10:56:04+5:30
Mahipal Maderna passed away: मंत्रिपदावर असताना महिपाल मदेरना यांना अटक झाली होती.
जोधपूर: भंवरी देवी अपहरण आणि हत्येतील आरोपी माजी मंत्री महिपाल मदेरना(69) यांचे आज निधन झाले. मदेरना बराच काळ कर्करोगाशी लढत होते. त्यांनी रविवारी सकाळी 7.40 वाजता जोधपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. मदेरना यांचे पार्थिव 10 वाजता त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल. मदेरना यापूर्वी गेहलोत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर राजस्थानच्या प्रसिद्ध भंवरी देवी अपहरण आणि हत्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. अटकेनंतर त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं. सध्या ते जामिनावर बाहेर होते.
महिपाल मदेरना हे राजस्थानकाँग्रेसचे दिग्गज नेते परसराम मदेरना यांचे पुत्र होते. मागील गेहलोत सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री होते. महिपाल मदेरना बराच काळ कर्करोगाशी लढत होते. मदेरना यांचे पार्थिव सकाळी 10 वाजता त्यांच्या मूळ गावी चाडी येथे नेण्यात येईल. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मदेरनांच्या मृत्यूच्या बातमीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली.
भंवरी हत्या प्रकरणातील आरोपी
प्रसिद्ध भंवरी देवी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून महिपाल मदेरना 10 वर्षे तुरुंगात होते. या प्रकरणात त्यांची अटक त्यांच्या मंत्रिपदावर असताना झाली. अलीकडेच त्यांना तुरुंगातून जामीन मिळाला होता. कर्करोगामुळे उपचारासाठी यापूर्वीही जामीन मिळाला होता.
कोण होते महिपाल मदेरना?
काँग्रेस नेते महिपाल मदेरना यांचा जन्म 5 मार्च 1952 रोजी झाला. मदेरना यांनी जय नारायण व्यास विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि येथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. महिपाल मदेरना हे दोन वेळा आमदार होते, तर त्यांची मुलगी दिव्या मदेरना सध्या ओसियनमधून आमदार आहे. त्यांची पत्नी लीलादेवी यांची नुकतीच जोधपूरच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. 19 वर्षांपासून जोधपूर जिल्हाप्रमुख पदावर महिपाल मदेरना विराजमान होते.