चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मंत्री इंदिरा कुमारी आणि त्यांचे पती बाबू यांना पैशांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इंदिरा कुमारी आणि त्यांचे पती बाबू यांच्यावर या प्रकरणी १९९६ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Former minister and her husband sentenced to 5 years in prison in corruption case)
विशेष न्यायालयाने २५ वर्षांनंतर या प्रकरणी निकाल सुनावला आहे. दरम्यान कोर्टाने निकाल देताना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर माजी मंत्री इंदिरा कुमारी यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी २००४ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र हा खटला सुमारे १७ वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन एलिसिया यांनी बुधवारी या प्रकरणात निकाल सुनावला.
आरोपी इंदिरा कुमारी ह्या समाज कल्याण मंत्री असताना त्यांच्यावर सरकारी पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. इंदिरा कुमारी ह्या १९९१ ते १९९६ या काळात जयललितांच्या नेतृत्वाखाली एआयएडीएमके सत्तेवर असताना समाजकल्याणमंत्री होत्या. त्यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित ट्रस्टच्या नावावर जनतेकडून पैसे उकळून त्यांचा अपाहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अखेर २५ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागून माजी मंत्री आणि त्यांच्या पतीला शिक्षा झाली आहे.