ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उग्र राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण गीता आणि उपनिषदांचे धडे घेत असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर राहुलजींना हे शिक्षण कोण देत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आता अखेर राहुल यांना गीता आणि उपनिषदांचे धडे देण्याची जबाबदारी काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश हे राहुल गांधींना गीतेचे पाठ शिकवत आहेत. रेडिफमेल.कॉम या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जयराम रमेश यांना गीतेचे सर्वे 18 अध्याय पाठ आहेत. तसेच ते त्यातील एक एक अध्याय राहुल गांधी यांना शिकवत आहेत. एवढेच नाही तर रमेश यांना गीतेचे अनेक श्लोक पाठ आहेत. तसेच ते न पाहता हे श्लोक ऐकवू शकतात.
राहुल गांधी यांनी रविवार चेन्नईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मी भाजप आणि आरएसएसविरुद्ध लढत आहे. त्यामुळे मी सध्या उपनिषद आणि गीतेचा अभ्यास करत आहे, असे म्हटले होते. सगळी माणसे समान आहेत, असे उपनिषदांमध्ये म्हटले आहे. मग तुम्ही आपल्याच धर्मात सांगितलेली गोष्ट का नाकारत आहात, असा सवालही त्यांनी भाजपा आणि संघाला केला होता.