अलवर: माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मला दगडाचं उत्तर एके-47नं देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटी पॅक करुन पाठवून देईन, असं ते पुढे म्हणाले. सिंह यांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालं आहे. रामगढ विधानसभेचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांच्या मृत्यूनंतर निवडणूक स्थगित करण्यात आली. या ठिकाणी 28 जानेवारीला मतदान होणार असून 31 जानेवारीला मतमोजणी पार पडेल. जगत सिंह यांनी 9 जानेवारीला या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्याचा व्हिडीओ सध्या वायरल झाला आहे. 'मी मागे हटणार नाही. गोळी झाडली गेली, तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर झेलेन. दगडाचं प्रत्युत्तर एके-47नं कसं द्यायचं, हे मला माहीत आहे. त्यामुळे या अशोकजी, या मोदीजी, या वसुंधराजी, सर्वांना पेटी पॅक करुन पाठवेन,' असं जगत सिंह म्हणाले.
'मोदी, गेहलोत, वसुंधरा यांना पेटी पॅक करून पाठवून देईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 1:28 PM