बेंगळुरू - महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे कानडी-मराठीचं नातं किती टोकाचं आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. असं असताना, कर्नाटक विधानसभेची सूत्रं एका मराठी भाषक नेत्याच्या हातात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या दोन आमदारांची नावं चर्चेत असून त्यात एक मराठी भाषक आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून एचडी कुमारस्वामी उद्या - बुधवारी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी कुणी शपथ घेणार का, कोण घेणार, याबद्दल काहीच स्पष्ट झालेलं नाही. बहुधा, आधी कुमारस्वामी एकटेच शपथ घेतील आणि नंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असं बोललं जातंय. कारण, जेडीएस आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. त्यावरून बरीच रस्सीखेच होण्याची चिन्हं आहेत. म्हणूनच, खातेवाटपाआधी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे.
काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जाणारे, आठ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले नेते, राज्याचे माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. ७१ वर्षीय देशपांडे हे हलियाल मतदारसंघाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात ते मध्यम आणि अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. पाचव्यांदा आमदार झालेले के आर रमेश कुमार हेही या शर्यतीत असल्याचं कळतं. त्यात देशपांडे यांनी बाजी मारली, तर कर्नाटक विधानसभेतील सर्वोच्च स्थानी मराठी भाषक विराजमान होईल.
उपमुख्यमंत्री कोण आणि किती?
मुख्यमंत्री जेडीएसचा आणि उपमुख्यमंत्री काँग्रेसचा, असा फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवला होता. परंतु, आमच्या माणसाला उपमुख्यमंत्री बनवा, अशा मागणीची तीन पत्रं वेगवेगळ्या समाजाच्या संघटनांनी दिल्यानं कुमारस्वामींची डोकेदुखी वाढताना दिसतेय. त्यामुळे कर्नाटकमध्ये दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा विचारही पुढे आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने जी. परमेश्वर यांचे नाव नक्की केलं आहे. आता दुसरे उपमुख्यमंत्री होणार का, ते कोण होणार याबद्दल अनिश्चितता आहे.