नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर सध्या महाराष्ट्रात आहे. पण तेलंगणात राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह अनेक नेत्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगणातील प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. खरं तर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवू पाहत आहेत. राज्यातील काही माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आज ते त्यांच्या मंत्रीमंडळासह महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ते मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोण आहेत पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी?पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे खम्मम लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर त्यांनी केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केला. तेलंगणा सरकारमध्ये ते ग्रामविकास मंत्री राहिले आहेत. या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समितीतून निलंबित करण्यात आले होते. तेलंगणाचे माजी मंत्री आणि पाच वेळा आमदार श्री जुपल्ली कृष्ण राव, माजी खासदार श्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांसह अनेक तेलंगण कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.