पंजाबमध्ये मोठी घौडदौड; 'या' व्यक्तीच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रिपदाची माळ?, हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 08:56 AM2021-09-19T08:56:32+5:302021-09-19T08:57:04+5:30
पंजाबमध्ये काँग्रेस एक नाही तर दोन उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यात एक दलित तर दुसरा शीख उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे.
चंदीगड: मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील छत्तीसचा आकडा, त्यातून दोघांचे झालेले गट, वाढलेली गटबाजी आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता व असंतोष यांचा स्फोट होत आहे, हे लक्षात येताच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे आदेश शनिवारी दिले. त्यामुळे सिंग यांनी पद सोडले खरे, तर तसे करताना थेट बंडाचीच भाषा केली.
मुख्यमंत्रिपदासाठी नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड या दोघांची नावे सर्वात पुढे आहेत. जाखड हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष असून, चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. माजी लोकसभाध्यक्ष स्व. बलराम जाखड यांचे ते चिरंजीव आहेत. अमरिंदर सिंग राजीनामा देणार हे स्पष्ट होताच जाखड यांनी घाईघाईने ट्विट करून पक्षाने घेतलेल्या निर्णयाची तरफदारी केली आणि राहुल गांधी यांचेही कौतुक केले.
नवज्योतसिंग सिद्धू यांचं नाव चर्चेत असलं तरी, सुनील जाखड यांच्याच गळ्यात पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे. जाखड हे माजी खासदार आहे तसच माजी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षही आहेत. विशेष म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेस एक नाही तर दोन उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यात एक दलित तर दुसरा शीख उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे.
नवज्योत सिद्धू पाकचे हस्तक- अमरिंदर सिंग
नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री अजिबात करू नका, त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, पंतप्रधान इम्रान खान व तेथील लष्करप्रमुख बाजवा हे सिद्धू यांचे दोस्त आहेत, असा आरोप करत या सर्व बाबी आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानावर घातल्या असल्याचे अमरिंदर यांनी सांगितले. तसेच सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. सिद्धू यांना मुख्यमंत्री केल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राजीनामा द्या, माझा नाईलाज आहे-
तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना आदेश देण्यात आला. त्यावेळीही आपल्यामागे इतके आमदार आहेत, आता नेता बदलल्यास विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल, सिद्धू यांना मुख्यमंत्री करणे हे तर काँग्रेस व राज्यासाठी मोठे संकटच ठरेल, असे सिंग यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर माझा नाईलाज आहे, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, असे त्या म्हणाल्या.
कोण आहेत सुनील जाखड?
सुनील जाखड हे माजी खासदार आहेत, राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. ते 2002 ते 2017 असे सलग तीन टर्म अबोहर विधानसभा मतदार संघातून निवडूण आले. 2012 ते 17 दरम्यान ते पंजाब विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेही होते. गुरुदासपूरमधून सुनील जाखड खासदार झालेले होते. 2017 च्या पोटनिवडणुकीत त्यांना यश मिळालं होतं. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा गुरुदासपूरमधून पराभव झाला. अभिनेता सनी देओलनं तो केला. जाखड यांना मुख्यमंत्री केलं तर पंजाबमधली हिंदू मतं काँग्रेससोबत राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.