नवी दिल्ली - शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकजण शिकत असतो. काम आणि इतर गोष्टींमुळे कधी कधी शिक्षण थोडं मागे पडतं. मात्र याला काही जण अपवाद असतात. लग्नानंतर किंवा अगदी 70 व्या वर्षीही पीएचडी किंवा पदवी घेणारे काही जण असतात. असंच एक उदाहरण ओडिशामध्ये पाहायला मिळालं आहे. 81 वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेले नारायण साहू हे सध्या पीएचडीची परीक्षा देत आहेत.
नारायण साहू हे पालहारा येथून दोन वेळेस आमदार झाले असून देवगढ येथील खासदार आहेत. साहू यांना सुरुवातीला राजकारणात रस होता. मात्र, राजकारणातील अनेक चुकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 1963मध्ये साहू यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर 2009 मध्ये पुढील शिक्षण त्यांनी उत्कल विद्यापीठातून घेतले.
2016 पासून साहू यांनी पीएचडीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ते एक आत्मकथा ही लिहीत आहेत. पीएचडी पूर्ण करण्यासाठी नारायण साहू हे सध्या येथील उत्कल विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. साहू इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वसाधारण रुममध्ये राहतात. त्यामध्ये त्यांच्या बेडवर मच्छरदानी, पुस्तकांनी भरलेले, अभ्यासाच्या साहित्यांनी भरलेले टेबल आणि त्यांच्या कुटुंबियांची काही छायाचित्रेहीआहेत.