नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज सकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंजत होते. शेवटी आज दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राबाहेरील चेहरा अशी डी. पी. त्रिपाठी यांची ओळख होती.
डी. पी. त्रिपाठी यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1952 रोजी उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येते झाला होता. ते विद्यार्थीदशेत जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिले होते. डी. पी. त्रिपाठी यांनी राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्रिपाठी यांनी शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसदेत खासदार होते.