पुणे: माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी आणि पुण्याचे नाते अतूट राहिले आहे. पुण्यात अनेक कार्यक्रम, बैठका, जाहीर सभा याकरिता वाजपेयी यांचे येणे असायचे. त्यांची उतरण्याची ठिकाणेही ठरलेली. पण त्यातही त्यावेळी कार्यकर्ते असलेले, पण आता नेते झालेल्यांना त्यावेळी त्यांनी जवळ बोलवून गप्पा मारल्या, काही वेळा मार्गदर्शन केले आणि हौसेने फोटोही काढले. त्यातल्या आमदार विजय काळे, महापौर मुक्ता टिळक आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जागवलेल्या या आठवणी.
मला निश्चित साल आठवत नाही. पण १९८४च्या आसपासची गोष्ट असेल. पुण्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. त्यावेळी आम्हा कार्यकर्त्यांकडे नियोजन व्यवस्था होती.दुपारी मुक्कामाची सोय असलेल्या विविध मंगल कार्यालयात जाऊन आम्ही गाद्या टाकण्याची कामे करत होतो. स्वयंवर मंगल कार्यालयात पोहोचल्यावर काम करून आम्हा कार्यकर्त्यांची मस्ती सुरु होती. गाद्यांवर बसून एकमेकांना उशा मारून आमचे हास्यविनोद सुरु होते. अचानक आमची उशी एका दिशेने गेली आणि बघतो तर काय मागे वाजपेयीजी उभे होते. राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा कोणताही आविर्भाव न आणता ते आमचा खेळकर संवाद बघत होते. अर्थात त्यांना बघितल्यावर आम्ही शांत झालो. मात्र तेव्हा ते स्वतः आमच्या गोलात मांडी घालून बसले आणि गप्पा मारल्या. कार्यकर्त्यांनी उत्साही असलंच पाहिजे असा सल्लाही दिला. ती पंधरा मिनिटं आणि त्यांचं जमिनीवर असणं कायम लक्षात राहील असंच आहे.
- विजय काळे, आमदार शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
-----------------------
वाजपेयी यांना टिळक कुटुंबाबद्दल कायम आस्था होती. लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाला ते आले होते. वसंत व्याख्यानमालेतही त्यांनी विचार मांडले होते. केसरीवाडा गणपतीचे दर्शनही त्यांनी घेतले होते. आम्हा तरुण कार्यकर्त्यांची बैठक सुरु असताना टिळक घराण्यातील व्यक्ती म्हणून त्यांनी आस्थेने केलेली माझी चौकशी मी कधीच विसरू शकणार नाही.
- मुक्ता टिळक, महापौर
-------------------------------
वाजपेयीजी आणि पुण्याचा संबंध खूप जवळचा होता. पुण्यात आल्यावर ते खूश असायचे. त्यांचे अनेक स्नेही पुण्यात होते. ते व्यासपीठावर तर बोलायचेच, पण खासगी गप्पांमध्ये आधी खुलायचे. भाजपची राष्ट्रीय बैठक सुरु असताना ते आणि अडवाणीजी हजर होते. त्याकाळात त्यांची मैत्री खूप जवळून अनुभवयाला मिळाली. ते दोघे एकत्र असताना एक जण बोलायचा आणि दुसरा उद्याच्या बैठकीचे प्रारूप तयार करायचा. राजकारणात राहूनही इतका स्नेह असू शकतो हे तेव्हाच मनावर बिंबले होते.
दुसरा अनुभव अगदी मला स्वतःला आला. अटलजी एकदा पुण्यात आले असताना माझ्याकडे त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी होती. त्यावेळची माझी शरीरयष्टी बघून त्यांना मी पोलीस वाटलो. त्यामुळे त्यांनी 'आप चिंता मत करो, नीचे आरामसे बैठो' असे सांगितले. मी मात्र बाहेर उभा होतो. अखेर त्यांनी एका ज्येष्ठ नेत्याला बोलावून पोलिसांना खाली पाठवा, उभं राहण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. संबंधित नेत्याने मी पोलीस नसून कार्यकर्ता आहे, असा खुलासा केल्यावर त्यांनी मला फार प्रेमाने आत बोलावले. त्यावेळी ते म्हणाले की, 'अरे भाई, मुझे बोलने का ना, चलो हम फोटो निकालते है'. त्याकाळात फोटो आजच्यासारखे वेड नसताना त्यांनी आस्थेने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा सुवर्णक्षण अनुभवला.
योगेश गोगावले, शहराध्यक्ष