नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेतेमंडळी एम्समध्ये जाऊन त्यांची भेट घेत आहेत. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, यावेळी मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते माझे आई-वडील आहेत. प्राणिसंग्रहालयातील दिखावू प्राणी नाहीत, या शब्दांत नाराजी व्यक्त केली.
झाले असे की, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी एम्स रुग्णालयात गेले होते. यावेळी एक फोटोग्राफर सोबत होता. मनमोहन सिंग यांच्या पत्नींनी या फोटोग्राफरला बाहेर जायला सांगितले. मात्र, त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मनमोहन सिंग यांचा एक फोटो घेतला. यावरून मनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत
माझे आई-वडील सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत. माझ्या आईने फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्याने ते ऐकले नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेही याबाबत काही बोलले नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत एम्सचे संचालयक डॉ. रणदीप गुलेरियाही होते. तरीही माझ्या आई-वडिलांना त्रास सहन करावा लागला. ते माझे आई-वडील आहेत, कोणत्याही प्राणिसंग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेले प्राणी नाहीत, या शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
मांडवीय यांनी माफी मागावी
दमन सिंग यांनी काँग्रेसकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. पक्षाने यात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनसुख मांडवीय हे मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते की, फोटो काढण्यासाठी, असा खोचक सवाल करत काँग्रेसने या गोष्टीचा निषेध केला आहे. तसेच मांडवीय यांनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधानमनमोहन सिंग यांची तब्येत अचानक बिघडली असून, त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना १९ एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना २९ एप्रिलला सोडण्यात आले होते. आता पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.