नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान जगद्गुरू श्री रामभद्राचार्य महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'जसं एक माळी आपल्या लावलेल्या झाडाला फुललेली आणि फळे येताना पाहून वाट पाहतो, त्याचप्रकारे मीही वाट पाहतोय', असं श्री रामभद्राचार्य महाराज यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी डोळ्यांच्या ऑपरेशनबाबत दिलेल्या प्रस्तावाबाबत देखील माहिती दिली.
रामभद्राचार्य महाराज म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४मध्ये मला माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी हे जग आता पाहण्यासारखे नाही. जर कोणी पाहण्यासारखे असेल, तर फक्त नील-कमल-श्याम-भगवान राम पाहण्यासारखे आहेत, असं उत्तर देत डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचा प्रस्ताव रामभद्राचार्य महाराज यांनी फेटाळला होता.
रामभद्राचार्य महाराज कोण आहेत ?
रामभद्राचार्य महाराज केवळ २ महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली. त्यांच्या डोळ्यांना ट्रॅकोमाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. रामभद्राचार्य महाराज वाचू किंवा लिहू शकत नाहीत. अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात. रामभद्राचार्य महाराज फक्त ऐकून शिकतात. २०१५मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. रामभद्राचार्य महाराज एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत. ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.