जयपूर - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सोमवारी राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करुन डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेवर डॉ. मनमोहन सिंग निवडून आलेत. त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही.
१३ ऑगस्ट रोजी मनमोहन सिंग यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. राजस्थानमधील मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर राज्यसभेतील ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागेवर काँग्रेसकडून डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे देण्यात आलं.
मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाळ १४ जून रोजी संपुष्टात आला होता. आसाममधून ५ वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून ते निवडून आलेत. मनमोहन सिंग २००४ पासून २०१४ पर्यंत पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. तसेच ६ वर्ष ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. २०१३ मध्ये राज्यसभेत ते निवडून आले होते.
भाजपाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर राज्यसभेतील ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने या जागेवर डॉ. मनमोहन सिंग यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपाकडून त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्यात आला नाही. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे ३ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यसभेचे खासदार म्हणून असतील. मनमोहन सिंग यांच्या विजयानंतर राज्यसभेतील काँग्रेसची संख्या वाढणार आहे.