मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:22 PM2023-09-18T15:22:26+5:302023-09-18T15:23:39+5:30

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसद भवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Former PM Manmohan Singh used to talk less and work more; Said that Congress MP Adhir Ranjan Chaudhary | मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला

मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला

googlenewsNext

नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज जुन्या इमारतीतच झाले. यावेळी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसद भवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधानांची आठवणी सांगितल्या.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मनमोहन सिंग यांना ते नेहमी मौन राहायचे. परंतु ते मौन बाळगायचे नाही. उलट ते कमी बोलायचे आणि जास्त काम करायचे. जेव्हा जी-२० परिषद झाली तेव्हाही त्यांनी हे आपल्या देशासाठी चांगले आहे, असं म्हणाले होते. आज या सभागृहाचा शेवटचा दिवस असल्याने भावूक होणे स्वाभाविक आहे. देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी येथे दिग्गज आणि देशभक्तांचे योगदान आहे. आपले अनेक पूर्वज हे जग सोडून गेले. त्यांची आठवण आपण करत राहू, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. 

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, जेव्हा संसदेत संविधानावर आणि लोकशाहीवर चर्चा होईल तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी नक्कीच बोलले जाईल. ते पुढे म्हणाले, 'नेहरूजींना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जायचे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संविधानाचे जनक मानतो. आज नेहरूजींबद्दल बोलण्याची संधी मिळाली हे बरं झालं, असं अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. भगतसिंग यांनी १९२९ मध्ये या संसदेत बॉम्ब फेकला होता, पण त्यांचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता. ब्रिटिश सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी हे केले. २००१ मध्ये या संसदेवरच दहशतवादी हल्ला झाला होता. आमच्या सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. आज सर्वांच्यावतीने आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो, असं अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भावूक-

७५ वर्षांचा संसदीय प्रवास पुन्हा एकदा लक्षात ठेवण्याची आणि नव्या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाचे क्षण आठवून पुढे जाण्याची ही संधी आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर या इमारतीला संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. मात्र या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा पैसा, घाम आणि कष्ट आहे, हे आपण अभिमानाने सांगू शकतो, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जुन्या संसद इमारतीचं संग्रहालय करण्यात येणार आहे. संसदेचा इतिहास सामान्य जनतेला सदैव पाहता येणार आहे. नव्या संसद इमारतीत जाण्याची प्रक्रिया भावनिक असल्याचं सांगत नरेंद्र मोदी भाषण करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

सर्व खासदारांचे ग्रुप फोटो काढले जाणार-

लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व ७९५ सदस्य (लोकसभेचे ५४५ खासदार आणि राज्यसभेचे २५० खासदार) मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सामूहिक छायाचित्रासाठी जमतील. पहिल्या फोटोत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतील. दुसऱ्या फोटोत फक्त लोकसभा सदस्य आणि तिसऱ्या फोटोमध्ये फक्त राज्यसभेचे सदस्य असणार आहे. 

Web Title: Former PM Manmohan Singh used to talk less and work more; Said that Congress MP Adhir Ranjan Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.