मुंबई: ही गोष्ट 1991 ची आहे. त्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झाली होती. अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. राजीव यांच्या हत्येनंतर वाजपेयी अतिशय भावूक झाले होते. त्यावेळी एका पत्रकाराशी बोलताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'आज मी जिवंत आहे, तो केवळ राजीव गांधींमुळे,' अशा शब्दांमध्ये वाजपेयींनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. वाजपेयी यांचं विधान राजीव गांधी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं होतं. वाजपेयींना 1991 च्या आधी किडनीचा त्रास होत होता. यावरील उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला जायचं होतं. मात्र आर्थिक कारणांमुळे त्यांना ते शक्य नव्हतं. त्यावेळी राजीव गांधी वाजपेयी यांच्या मदतीला धावून गेले होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर वाजपेयी यांनी याच घटनेची आठवण झाली आणि ते अतिशय भावूक झाले. राजीव गांधींना माझ्या आजारपणाची माहिती कुठून मिळाली माहित नाही. मात्र त्यांनी माझ्यासाठी मदतीचा हात पुढे केला, असं वाजपेयींनी एका पत्रकाराशी संवाद साधताना म्हटलं. 'मला उपचारासाठी परदेशात जाण्याची गरज आहे. मात्र आर्थिक कारणांमुळे मला ते शक्य नाही, हे राजीव गांधींना समजलं. यानंतर त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं. न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रात जात असलेल्या प्रतिनिधी मंडळात तुमचा समावेश करण्यात आला आहे, असं त्यावेळी मला राजीवजींनी सांगितलं. आता या संधीचा फायदा घेऊन तुम्ही उपचार करुन घ्या, असा सल्लादेखील राजीव यांनी मला दिला होता. मी आज जिवंत आहे, तो फक्त राजीव गांधींमुळे,' अशी आठवण त्यावेळी वाजपेयींनी एका पत्रकाराला सांगितली होती.
Atal Bihari Vajpayee Death: ...जेव्हा वाजपेयींनी म्हटलं होतं, मी जिवंत आहे तो केवळ राजीव गांधींमुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:29 PM