राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 06:30 PM2018-06-02T18:30:11+5:302018-06-02T18:30:11+5:30
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आदित्यनाथ यांची जोरदार टीका
लखनऊ: केंद्रात मोदी सरकार आल्यावर दलालांचं अस्तित्वच संपलंय, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. दलालांना सध्या दलालीच मिळत नाही. त्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत, असं आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. माजी पंतप्रधान राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शनिवारी हरदोई जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधींवर त्यांनी जोरदार टीका केली. 'तीस वर्षांपूर्वी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. विकासासाठी 100 रुपयांचा निधी पाठवल्यावर लोकांपर्यत फक्त 10 रुपये पोहोचतात, असं खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यावेळचं सरकार लाचार होतं. मोदींच्या काळात संपूर्ण 100 रुपयांचा निधी जनतेपर्यंत पोहोचतो,' असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
देशात पहिल्यांदाच लोकांपर्यंत सर्वाधिक निधी पोहोचत असल्याचा दावादेखील योगींनी केला. 'विकासासाठी खासदार, आमदारांना जितका निधी मिळत नाही, तितका निधी आता सरपंचांना मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान उंचावेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधान ग्राम समाधान दिवसाचं आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. यामुळे पंचायतीच्या माध्यमातून वादविवाद मिटवले जातील. यामध्ये महसूल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचादेखील सहभाग असेल. यामुळे गावातील लोकांना पोलीस ठाण्यात, न्यायालयात जावंच लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.