Brij Bhushan Sharan Singh | नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील नामांकित पैलवान मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. आज २३ मे रोजी या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांसह, महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पैलवानांची आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असला तरी आंदोलक पैलवान सिंह यांच्या अटकेवर ठाम आहेत. भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांनी नार्को टेस्ट करण्याचे आव्हान पैलवानांना दिले होते. पैलवानांनी देखील हे आव्हान स्वीकारून सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली लाईव्ह व्हावे असे म्हटले आहे.
दरम्यान, मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना ब्रिजभूषण यांनी पैलवानांवर बोचरी टीका केली. देशातील खरे खेळाडू मैदानात सराव करत असून जे जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत, त्यांचा खेळ संपला असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच आंदोलक पैलवान पुढे जाऊन खेळणार नाहीत, ते आता निवडणुक लढवतील. कुस्ती महासंघात अशा घटना घडल्या असतील तर त्यांनी या आधी प्रश्न का विचारला नाही, असा सवालही त्यांनी केला.
...तुरूंगात जायला तयार - सिंह एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजभूषण यांनी म्हटले, "मी कोणत्याही खेळाडूला भेटण्यासाठी जंतरमंतरवर जाणार नाही. या खेळाडूंकडे आताच्या घडीला काहीच उरलेले नाही. आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आहे, याचा निर्णय दिल्ली पोलिसांच्या तपासात होईल. तपास सुरू आहे आणि तपासात माझी चूक सिद्ध झाली तर मी तुरुंगात जाण्यास तयार आहे."
आंदोलनाला एक महिना पूर्ण ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.