नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातील नामांकित महिला पैलवानांनी लैगिंक छळाचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. "एका तक्रारदाराने अशा सहा ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे ब्रिजभूषण यांनी तिचा विनयभंग केल्याचे सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंतच्या तपासानुसार, ब्रिजभूषण सिंह हे लैंगिक छळ, विनयभंग या गुन्ह्यांसाठी कायदेशीर कारवाईसाठी पात्र आहेत", असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
तसेच ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात एकूण २१ साक्षीदारांनी जबाब नोंदवले आहेत. यातील सहा जणांनी सीआरपीसी १६४ अन्वये आपले म्हणणे मांडले असल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. लक्षणीय बाब म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह यांना न्यायालयाने १८ जुलै रोजी समन्स बजावले आहे.
दरम्यान, २३ एप्रिलपासून जवळपास दीड महिने पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला देशातील विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पैलवानांनी आखाड्याबाहेरील कुस्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.