नवी दिल्ली : २३ एप्रिलपासून सुरू असलेल्या पैलवानांच्या आंदोलनावर काल तोडगा निघाल्याचे दिसले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलक पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. पण आज विनेशने एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?, असा प्रश्न तिने विचारला आहे.
बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले... पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, संवेदनशील विषयावर कुस्तीपटूंशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितले की, या बैठकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण करून दिल्ली पोलिसांना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत होईल. म्हणजेच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी नवा व्यक्ती विराजमान होईल. जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत आयोगाच्या समितीकडून दोन जणांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महिला कुस्तीपटूंना आवश्यकतेनुसार सुरक्षा मिळेल याची आम्ही काळजी घेऊ, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
पण आता विनेश फोगाटने एक ट्विट करून प्रश्न विचारला आहे. "भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?", असा प्रश्न तिने विचारला आहे. याशिवाय न्यायाच्या या लढ्याला दिरंगाई झाल्यामुळे या मुली एक एक करून हिंमत गमावणार नाहीत ना?, असे देखील तिने विचारले आहे.
२३ एप्रिलपासून आखाड्याबाहेरील कुस्तीभारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी देशातील नामांकित पैलवान २३ एप्रिलपासून आंदोलन करत आहेत. जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले आहे.