ब्रीजभूषण शरण सिंह वादग्रस्त प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांनी महिला पैलवानांसह महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप पैलवानांनी केला. ब्रीजभूषण हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त केल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर निवडणूक पार पडली. नवीन अध्यक्ष निवडून आला असला तरी वाद कायम राहिला होता. अखेर ही देखील समिती बरखास्त करण्यात आली. आता ब्रीजभूषण यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक किस्सा सांगितला आहे.
दोन वर्षांपासून होत असलेल्या आरोपांनंतर पंतप्रधान मोदींसह इतर केंद्रीय मंत्र्यांशी तुम्ही चर्चा केली का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून मी मोदींना भेटलो नाही. यासाठी प्रयत्न देखील केला नाही. पक्षाची बैठक असते तेव्हा हा क्षण अनेकदा आला. पण मी भेट टाळली किंबहुना त्यांच्यासमोर गेलो नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मी तिथून बाजूला झालो ही माझी इच्छा. मी बाजूला झालो किंवा याला तुम्ही असेही म्हणू शकता की, मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या वादामुळे मी कोणत्या तोंडाने मोदींना पाहू... जरी हा वाद चुकीचा असला तरी मी त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. जरी हे आरोप चुकीचे असले तरी मी जोपर्यंत निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत मोदींचा सामना करणार नाही. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ब्रीजभूषण यांची 'मन की बात'तसेच अमित शाह, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा होत असल्याची कबुली ब्रीजभूषण यांनी दिली. लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत याबाबत वरिष्ठांशी काय चर्चा झाली का? यावर ब्रीजभूषण यांनी म्हटले, "हे सर्वकाही तुम्ही ठरवू शकता... तुम्ही बघू शकता की मोठे वादळ सुरू आहे. अशी अनेक प्रकरणे मी पाहिली आहेत. हे प्रकरण असे आहे, जिथे ना ऑडिओ, ना व्हिडीओ, ना साक्ष, ना तारीख, ना दिवस, ना वर्ष काहीच सांगितले जात नाही. जागाही बदलण्यात आली आहे. आधी मंगोलियामध्ये हा प्रकार घडल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ही स्पर्धा मंगोलियात झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाला मी केस मानत नाही." एकूणच आरोप खोटे असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत पंतप्रधान मोदींना चेहरा दाखवणार नसल्याचे ब्रीजभूषण यांनी स्पष्ट केले.