कोलकाता : आरएसएसच्या नागपुरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातील सहभागाबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पहिल्यांदा भाष्य केलं. याबद्दल होत असलेल्या चर्चांना नागपुरात संघाच्या कार्यक्रमातच उत्तर देऊ, असं मुखर्जींनी म्हटलं आहे. 'मला जे काही बोलायचं आहे, ते मी नागपुरात बोलेन,' असं मुखर्जी यांनी बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. मला अनेकांनी पत्रं पाठवली आहेत. अनेकांचे फोन आले आहेत. मात्र मी कोणालाही उत्तर दिलेलं नाही, असंही ते म्हणाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सी. के. जाफर शरीफ यांनी प्रणव मुखर्जींना पत्र लिहून कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. 'मुखर्जी यांच्यासारख्या विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या व्यक्तीनं संघासोबत कोणतीही जवळीक ठेऊ नये,' अशा आशयाचं पत्र मुखर्जी यांना लिहिल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास देशातील धर्मनिरपेक्ष वातावरणावर चुकीचा परिणाम होईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. आनंद बाजार पत्रिकेशी बोलताना जयराम रमेश यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. 'अचानक असं काय झालं की प्रणव मुखर्जी यांच्यासारखा महान नेता, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, ते संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत?' असा सवाल रमेश यांनी केला. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. 'आता त्यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असल्यानं याबद्दल वाद घालून काही होणार नाही. निमंत्रण स्वीकारलचं आहे, तर आता त्यांनी तिथे जावं आणि संघाच्या विचारधारेतील त्रुटी सांगाव्यात,' असं चिदंबरम म्हणाले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघ मुख्यालयात होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जे बोलायचंय ते संघाच्या कार्यक्रमातच बोलेन; प्रणव मुखर्जींनी मौन सौडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 5:50 PM