Pranab Mukherjee: देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन; मुलाने ट्विट करून दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:54 PM2020-08-31T17:54:32+5:302020-08-31T17:55:10+5:30
Pranab Mukherjee Passes Away: दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वावरत असले तरी प्रणव मुखर्जींनी पश्चिम बंगालमधील आपल्या गावाशी असलेले नाते कायम ठेवले होते.
नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज अखेर त्यांचा मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. (Pranab Mukherjee Passes Away)
प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
प्रणव मुखर्जींचा जन्म बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कामदा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी मुखर्जी यांच्या घरी झाला होता. त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते. १९६९ मध्ये ते प्रथम राज्यसभेवर नियुक्त झाले होते. १९६९ ते २००२ अशी तब्बल ३४ वर्षे त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच २००४ ते २०१२ या काळात ते लोकसभा सदस्य होते. या काळात त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून काम पाहिले. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जींनी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले. तसेच १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वावरत असले तरी प्रणव मुखर्जींनी पश्चिम बंगालमधील आपल्या गावाशी असलेले नाते कायम ठेवले होते. ते नियमितपणे आपल्या गावाला भेट देत असत. प्रणव मुखर्जींच्या पश्चात पुत्र अभिजित आणि इंद्रजित तसेच कन्या शर्मिष्ठा मुखर्जी असा परिवार आहे.