नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुखर्जी यांच्या 'कोअलिशन इयर्स 1996-2012' या पुस्तकाचा तिसरा खंड नुकताच प्रकाशित करण्यात आला. मुखर्जी यांनी आत्मकथेमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केले आहेत. आत्मकथेबाबत बोलताना माजी राष्ट्रपती यांनी पंतप्रधान न होण्याबाबत मोठा खुलासा केला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत प्रणब मुखर्जी यांनी सांगितले की, ''माझी हिंदी भाषा कमजोर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधण्यात अडचणी होत्या, त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी नव्हतो. जो नेता सर्वसामान्य जनतेच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही, तो पंतप्रधान होऊ शकत नाही'', अशी भावना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग खूप चांगले पंतप्रधान होते. मी स्वतःला कधीही पंतप्रधान बनण्यास पात्र समजलं नाही कारण माझ्याकडे जनतेसोबत संवाद साधण्याचं कोणतंही साधन नाही. संपूर्ण देशात हिंदी बोलणारे आणि समजणारे सर्वाधिक लोकं आहेत आणि माझी हिंदी भाषा चांगली नाही. दरम्यान, प्रणब मुखर्जी यांच्या आत्मकथा प्रकाशनावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनीही म्हटले होते की, पंतप्रधान पदासाठी प्रणब मुखर्जी योग्य होते.
मुलाखतीदरम्यान जेव्हा मुखर्जी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मनमोहन सिंग खूप चांगले आहेत आणि ते एक चांगले पंतप्रधानदेखील होते. मी यापूर्वी म्हटले होते आणि आजही सांगेन की डॉ. मनमोहन सिंग आताच्या काँग्रेस नेत्यांपैकी सर्वात चांगले नेते आहेत. सोनिया गांधी यांनी योग्य व्यक्तीला पंतप्रधान बनवलं होतं. त्यावेळी सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. यूपीएच्या घटक पक्षांनीही त्यांच्या नावाला मान्यता दिली होती. मात्र त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशिवाय पर्याय नव्हता, असे मुखर्जी म्हणाले.
यावेळी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान न बनण्याचे आणखी एक कारण सांगितले ते म्हणजे स्वतःचे राज्य. याबाबत सांगताना ते म्हणाले की, 'मी ज्या राज्यातून आलो होतो. त्या पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षांपासून डाव्यांची सत्ता होती. एखादा नेता पंतप्रधान होत असेल, तर त्याच्या राज्यात त्याच्या पक्षाची सत्ता नको का? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमोर ही समस्या नव्हती,' असेही त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.