नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कानपूरच्या कल्याणपूरमधील आपलं घर विकलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रपती बनल्यानंतर कोविंद यांना एकदाही या घरात जाता आलं नव्हतं. आता माजी राष्ट्रपतींनी हे घर कानपूरमधील एका डॉक्टर दाम्पत्याला विकले आहे. श्रीती बाला आणि शरद कटियार या डॉक्टर दाम्पत्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं घर खरेदी केल्याचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही आहे. शुक्रवारी पॉवर ऑफ अॅटर्नीच्या माध्यमातून कानपूरमध्ये घराची नोंदणी करण्यात आली. माजी राष्ट्रपती कोविंद यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी आनंद कुमार यांच्या नावाने केली होती. त्यांनी शुक्रवारी कानपूरमध्ये नोंदणी केली.
हे घर खरेदी केल्यानंतर डॉक्टर शरद यांनी सांगितले की, ईश्वर कृपेमुळे मला या घरात राहण्याचे भाग्य लाभणार आहे. हे माझे सौभाग्य आहे. तसेच या घराकडे मालमत्ता म्हणून न पाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी या व्यवहाराची किंमतही सांगितलेली नाही.
दरम्यान, दिल्लीमध्ये रामनाथ कोविंद यांना भेटल्यापासून माजी राष्ट्रपतींचा साधेपणा आणि सज्जनतेचं शरद कटियार हे कौतुक करत असतात. डॉक्टर दाम्पत्य शरद आणि श्रीती बाला हे बिल्हौर येथे श्री नर्सिंग होम नावाने एक खासगी रुग्णालय चालवतात. सध्या ते कान्हा श्याम अपार्टमेंटमध्ये राहतात. प्रोटोकॉल आणि परंपरेनुसार माजी राष्ट्रपती कोविंद यांना दिल्लीमध्ये बंगला मिळाला आहे. आता त्यांचे कुटुंबीय तिथेच राहतील.