नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 93 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी ट्विटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासहीत भाजपामधील दिग्गजांनी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपा प्रवक्ता संबित पात्रा, कैलाश विजयवर्गीयदेखील यावेळी हजर होते.
यांव्यतिरिक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपति एम. व्यकंया नायडू यांनीदेखील वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांचा मोठा चाहता वर्ग आहे. वाजपेयींचे चाहतेदेखील त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वाराणसी, कानपूरसहीत अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी हवन केले.
25 डिसेंबर 1924 रोजी वाजपेयी यांचा जन्म झाला. 1998 ते 2004 या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय आहेत. वाढदिवसानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर शुभेच्छा प्रचंड वर्षाव होत आहे.