नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान एचडी. देवगौडा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. मी आणि माझी पत्नी चेनम्मा, आम्हा दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरण कक्षात आहोत. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही देवगौडा यांनी केली आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी एका दिवसात राज्यात 27 हजार नऊशेपेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, चाचणीचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एकीकडे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून दुसरीकडे रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच, आज माजी पंतप्रधान देवगौडा यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
देवगौडा यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना काहीही काळजी न करण्याचं आवाहन केलंय. देवगौडा यांच्या कोरोनाच्या अहवालाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. तसेच, देवगौडा व त्यांच्या पत्नीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान, मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमध्ये मंगळवारी कोरोनाचे 2,975 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1262 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकट्या बंगळुरू शहरात 1,984 रुग्ण आढळून आहेत.