Parliament Monsoon Session : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी संसदेत झालेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली आहे. मागील दोन दिवसांपासून संसदेत सुरू असलेला गोंधळ या आधी कधीही पाहिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे प्रमुख देवेगौडा म्हणाले की, जेव्हा सर्व लोक सन्मान आणि शिष्टाचाराचे पालन करतात तेव्हाच लोकशाहीचे रक्षण होऊ शकते. एचडी देवेगौडा हे कर्नाटकचे राज्यसभा सदस्य असून त्यांनी संसदेत जे काही चालले आहे त्यावरून सरकारवर टीका केली. आताच्या घडीला संसदेत जे काही चालले आहे तो सर्वात खालचा स्तर असल्याचे त्यांनी नमूद केले.
संसदेत हजेरी लावल्यानंतर देवेगौडा यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीर केली. "प्रकृती अस्वस्थ असताना देखील मी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आलो होतो, परंतु जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप निराश आहे. माझ्या दीर्घ अनुभवावरून मी असे म्हणू शकतो की ही सर्वात खालची पातळी आहे. सर्वांनी सन्मान आणि शिष्टाचाराचे पालन केले तरच लोकशाहीचे रक्षण होऊ शकते", अशा शब्दांत माजी पंतप्रधानांनी सद्य घडामोडींवर भाष्य केले.
मणिपूरमधील हिंसाराचारावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष म्हणत आहेत की पंतप्रधान मोदींनी मणिपूर हिंसाचारावर सभागृहात भाष्य करावे, तर सरकार म्हणत आहे की विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत. यावरून मागील काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. बुधवारी खासदार राहुल गांधी यांनी महिला खासदारांच्या दिशेने फ्लाइंग किस केल्याचा आरोप करत स्मृती इराणींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर, विरोधी पक्षातील खासदार भाजपाला फटकारत आहेत.