HD Deve Gowda On Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान, जनता दल (सेक्यूलर) प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी काँग्रेसवर खोटक टीका केली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेगौडा म्हणाले की, 'काँग्रेसने आधी आपलं घर(पक्ष) व्यवस्थित करावं. विरोधी पक्षांसमोर अनेक पर्याय आहेत आणि या देशात नेत्यांचा खजिना आहे.'
2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट निर्माण करण्यासाठी काँग्रेसची भूमिका काय असावी? असा प्रश्न विचारला असता देवेगौडा म्हणाले की, 'या देशात काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष नाही. सर्वात आधी काँग्रेसने आपलं घर व्यवस्थित करावं. विरोधी पक्षांसमोर अनेक पर्याय आहेत आणि या देशात नेत्यांचा खजिना आहे.' मानहानी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी संपुष्टात आणण्याबाबत ते म्हणाले की, 'हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.' 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जेडी(एस)च्या संभाव्यतेबद्दल देवेगौडा उत्साहित आहेत. ते म्हणाले की, 'ही निवडणूक इतर राज्यांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवेल.'
देवेगौडा पुढे म्हणतात की, 'जेडी(एस) पक्षाचा प्रभाव फक्त जुन्या म्हैसूर प्रदेशापुरता मर्यादित आहे, हा राष्ट्रीय पक्षांनी केलेला चुकीचा प्रचार. राष्ट्रीय पक्ष अनेकदा मोठे आणि खोटे दावे करतात. आमच्या पक्षाने नेहमीच राज्यातून प्रत्येक समाजाचे आमदार दिले आहेत. कर्नाटकची निवडणूक इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी दिशा देणारी ठरेल.' जनता परिवार आणि तिसरी आघाडी पुन्हा उदयास येण्याच्या शक्यतेवर देवेगौडा म्हणाले की, 'सर्व काही शक्य आहे. पण मी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवत नाही. माझा विश्वास आहे की, आपण काहीही केले तरी या देशाचे आणि लोकशाहीचे रक्षण करणारी पहिली आघाडीच असेल.'