लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीमधील सेवांच्या प्रशासकीय अधिकारांबाबत अतिशय महत्त्वाचे असलेल्या दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक २०२३ वरील चर्चेत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सोमवारी सहभागी झाले होते. ९० वर्षे वयाच्या मनमोहनसिंग यांची गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठीक नाही. मात्र तरीही ते या सर्व अडथळ्यांवर मात करून राज्यसभेत उपस्थित राहिले.
या दुरुस्ती विधेयकावरील चर्चा व मतदानाप्रसंगी उपस्थित राहावे, असा व्हीप काँग्रेसने आपल्या राज्यसभा सदस्यांसाठी जारी केला होता. प्रकृती ठीक नसलेल्या आपल्या खासदारांना सभागृहात आणण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्थाही काँग्रेसने केली होती. दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक २०२३ मंजूर होऊ नये, असे काँग्रेसचे मत आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी व संसदीय कामकाजावरील निष्ठेमुळे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग बुधवारी राज्यसभेत उपस्थित राहिले. ते सभागृहात व्हील चेअरवरून आले होते. त्यांच्या या कार्यनिष्ठेला सभागृहातील सर्व सदस्यांनी मनापासून दाद दिली.