CPMच्या पोस्टरवर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचा फोटो, चौकालाही दिलं नाव, भाजपा आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:37 PM2023-01-05T15:37:23+5:302023-01-05T15:39:34+5:30
Kerala News: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे सीपीएमच्या महिला विंगकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमापूर्वी एका पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पोस्टर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे आहे.
तिरुवनंतपुरम - केरळमधील तिरुवनंतपुरम येथे सीपीएमच्या महिला विंगकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमापूर्वी एका पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पोस्टर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे आहे. आता केरळमधीलभाजपाने या पोस्टरवरून आयोजकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच या पोस्टरला आक्षेप घेतला आहे.
ऑल इंडिया डोमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनने ६ जानेवारी ते ९ जानेवारी या दरम्यान, केरळमध्ये नॅशनल वुमन्स कॉन्फ्रन्सचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाशी संबंधित एक पोस्टर तिरुवनंतपुरममधील पालयम परिसरात लावण्यात आला आहे. या पोस्टरमधून पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबद्दल गौरवोदगार काढण्यात आले आहेत. तसेच या पोस्टरमध्ये पलायम जंक्शन येथे शहीद स्मारक आहेस त्यालाही बेनझीर भुत्तो स्क्वेअर असं नाव देण्यात आलं आहे.
भाजपाच्या केरळ कार्यकारिणीने या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. तसेच ही पोस्ट तत्काळ हटवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ज्या नेत्याने भारतासोबत एक हजार वर्षे युद्ध लढण्याच्या वल्गना केल्या होत्या. तिच्याच गौरवार्थ केरळमधील सीपीएम सरकार पोस्टर्स लावत आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.केरळ भाजपाचे प्रवक्ते संदीप वाचस्पती यांनी या पोस्टरचा फोटो ट्विट करत केरळ सरकारवर घणाघाती टीका केली आहे.