पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:47 PM2021-10-27T12:47:03+5:302021-10-27T12:47:33+5:30
'आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार, भाजपला सोबत घेण्याचा विचार सुरू.'
चंदीगड:पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदीगडमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'मी पक्ष स्थापन करत आहे. माझ्या नव्या पक्षाचे नाव आता तुम्हाला सांगू शकत नाही. निवडणूक आयोग पक्षाचे नाव आणि चिन्ह मंजूर करेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेल.'
भाजपसोबत युती करणार ?
कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले, 'होय, मी नवा पक्ष काढणार आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर चिन्हासह नाव जाहीर केले जाईल. माझे वकील त्यावर काम करत आहेत. आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवू.' तसेच, भाजपसोबत युती करणार का ? या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, 'मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही बोललो नाही. आम्ही सीट शेअरिंग करू शकतो. याबाबत भाजपशी कोणतीही चर्चा झाली नसली तरी मी त्याबाबत विचार करत आहे.'
सिद्धूच्या जागेवर उमेदवार उभा करणार
पंजाबचे विद्यमान काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी असलेले त्यांचे राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आलं आहे. सिद्धू राज्यात कुठल्याही जागेवरुन लढू, आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार उतरवणार, असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'मी तिथे असताना 4.5 वर्षांत आम्ही काय मिळवले याची सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. मी जेव्हा पदभार स्वीकारला होता, तेव्हा हा आमचा जाहीरनामा होता. या जाहीरनाम्यानुसार आम्ही हे सर्व साध्य केलं आहे.'
गृहमंत्री रंधवावर पलटवार
पंजाबचे विद्यमान गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्यावर टीका करताना अमरिंदर सिंग म्हणाले की, मी 9.5 वर्षे राज्याचा गृहमंत्री होतो आणि जे लोक फक्त एका महिन्यापासून गृहमंत्री आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त माहीत असल्याचे सांगत आहेत. सध्या खलिस्तान आणि पाकिस्तान एकत्र काम करत आहेत. बीएसएफ पंजाब ताब्यात घेण्यासाठी आलेले नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी पंजाब पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे आले आहे. माझे प्राथमिक प्रशिक्षण हे सैनिकाचे आहे. मी 10 वर्षे देशाची सेवा केली आहे, त्यामुळे मला मूलभूत गोष्टी माहित आहेत. पंजाबची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे, जिथे गरज आहे तिथे सरकारने पंजाबच्या हितासाठी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.