नवी दिल्ली:भारताचा पुढील पंतप्रधान शीख बनेल. जर शीख पंतप्रधान नाही झाला तर मराठा नक्कीच देशाचा पंतप्रधान बनेल, असं वक्तव्य RAW चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत (amarjeet dullat) यांनी केलंय. त्यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी दुल्लत यांनी हे वक्तव्य केलं. पुण्यातील सरहद संस्थेतर्फे (sarhad institute pune) संत नामदेव पुरस्कार सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पार पडला. यावेळी बोलताना दुल्लत यांनी देशाचा पुढला पंतप्रधान मराठा होईल, असं भाकित व्यक्त केलंय.
अमरजीतसिंह दुल्लत पुढे बोलताना म्हणाले, 'संत नामदेव महाराजांचं काम विश्वव्यापी आहे. आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा लागणार आहे. अशा महान संताच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे.'
सरहद संस्थेतर्फे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक (satyapal malik) आणि रॉ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुल्लत यांना संत नामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता पण काही कारणास्तव ते सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सरहद संस्थेतर्फे संत नामदेव पुरस्कार हा सीमावर्ती भागातील अशा लोकांशी महाराष्ट्राचे नाते जोडण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. तेराव्या शतकातील संत-कवी नामदेव यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. संत नामदेवांना शिख धर्मात मानाचे स्थान आहे संत नामदेव यांनी 23 वर्षे पंजाबमध्ये राहून तेथील लोकांना भक्ती संप्रदायाची शिकवण दिली. नामदेवांनी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आपला देह ठेवला असे मानले जाते. कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय राष्ट्रीय कार्याबद्दल रुपये एक लाख एक हजार रोख आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दिला जातो.