Raghuram Rajan: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही यात्रा आता उत्तर भारतात पोहोचली असून, आतापर्यंत हजारो किमीचा प्रवास राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधींसोबत अनेक सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील मंडळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. यानंतर आता रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले असून, ते स्मार्ट आणि जिज्ञासू असल्याचे म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना रघुराम राजन म्हणाले की, राहुल गांधी यांची पप्पू म्हणून तयार केलेली इमेज चुकीची आहे. अशी इमेज तयार करणे दुर्दैवी आहे. राहुल गांधी एक स्मार्ट, युवा, जिज्ञासू व्यक्ती आहेत. जोखीम आणि त्याचे मूल्यांकन करण्याची चांगली क्षमता असणे अतिशय महत्त्वाचे आहे. या गोष्टींची चांगली समज राहुल गांधी यांना आहे, असे रघुराम राजन म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी मूल्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. म्हणूनच भारत जोडो यात्रेत मी त्यांच्यासोबत सहभागी झालो, असे रघुराम राजन यांनी नमूद केले.
राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही
या मुलाखतीत रघुराम राजन यांना तुम्ही राजकारणात येणार का, यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. केवळ पंतप्रधान मोदी यांची धोरणे, नीति यांच्यावर नाही, तर मनमोहन सिंह सरकारच्याही अनेक धोरणांवर टीका केली असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. तसेच २०२३ हे वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. युद्ध आणि अन्य कारणांमुळे जगातील आर्थिक समस्या वाढण्याची चिन्हे आहेत, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपण भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही. परंतु आपल्याला स्पर्धेसाठी लढावे लागेल. आम्ही बाजारातील मक्तेदारीच्या विरोधात असू शकतो. छोटे उद्योग, मोठे उद्योग देशासाठी चांगले आहेत पण मक्तेदारी देशासाठी चांगली नाही, असेही रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"