अहमदाबाद : उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहातून मूळ माफिया असलेला आणि आता राजकारणी झालेला अतिक अहमद याला प्रयागराज येथे नेले. तेथे त्याला २८ मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाईल. तेथील एका अपहरण प्रकरणात तो आरोपी आहे.
समाजवादी पक्षाचा माजी खासदार अहमद जून २०१९ पासून साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला त्याच्या मूळ राज्यातून तेथे हलवण्यात आले हाेते. प्रयागराजमधील एका न्यायालयाने अहमद हा आरोपी असलेल्या अपहरण प्रकरणात आपला आदेश देण्यासाठी २८ मार्च ही तारीख निश्चित केली आहे, असे प्रयागराजचे पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले.
अतिकवर उमेश पाल हत्येप्रकरणी आराेप
नुकत्याच झालेल्या उमेश पाल खून प्रकरणासह १०० हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अतिक अहमदचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदचा कथितरीत्या ज्या खळबळजनक खुनात सहभाग आहे, त्यापैकी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) आमदार राजू पाल यांची २००५ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांची यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे हत्या करण्यात आली होती.