योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान सर्फराझ अहमदने अर्धशतक झळकावलं आणि श्रीलंकेला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु सात गडी बाद झालेले असताना सर्फराझ अहमदला अत्यंत बहुमोल अशा 28 धावा करत साथ दिली होती मोहम्मद आमीरने, ज्यामुळे सर्फराझच्या खेळीचं चीज झालं. त्यानंतर दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीतल्या सामन्याला मोहम्मद आमीर मुकला होता, मात्र अंतिम सामन्यासाठी तो फिट ठरला आणि एवढंच नाही तर त्याच्या पहिल्या भन्नाट स्पेलने पाकिस्तानचा विजयही निश्चित केला. पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली यात वाद नाही. फकर झमानने शतकी खेळी केली आणि भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य ठेवलं. या खेळीसाठी फकरला सामनावीराचा किताबही दिला गेला, परंतु आमीरच्या गोलंदाजीनं जगात सगळ्यात बलाढ्य असलेली भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि फकरच्या फलंदाजीचं चीज झालं.
मोहम्मद आमीरनं तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रोहीत शर्माला शून्यावर पायचीत केलं आणि भारताला पहिलाच मोठा धक्का दिला. पाठोपाठ ऐन भरात असलेल्या शिखर धवनला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद करत आमीरने दुसरा धक्का दिला. खेळपट्टीवर उभा राहिला तर एकहाती सामना काढू शकतो अशी क्षमता असलेल्या विराट कोहलीला आमीरने जाळ्यात पकडलं. विराट अवघ्या पाच धावांवर असताना एका आउट स्विंग बॉलवर त्याला स्लीपमध्ये कॅच द्यायला आमीरनं भाग पाडलं. परंतु स्लीपमध्ये अझर अलीने अत्यंत सोपा कॅच सोडला आणि अझर अलीने कॅच नाही तर चँपियन्स ट्रॉफी ड्रॉप केली अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली. पाकिस्तानी कोच मिकी आर्थरने तर दोन्ही हात डोक्याला लावले, कारण हा सोडलेला झेल किती महागात पडू शकतो याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आमीरनेही हताश होत अझरकडे कटाक्ष टाकला, अझर अलीनेदेखील स्वत:वर चिडत कॅप जोरात आपटली आणि आपल्याकडून प्रचंड मोठा गुन्हा घडलाय याची अप्रत्यक्ष कबुली दिली. परंतु लढवय्या आमीरने धीर न सोडता ऑफ स्टम्पच्या बाहेर किंचित स्विंग होणारा गुड लेंग्थ चेंडू टाकला. विराटची ऑन साईडला खेळायची सवय लक्षात ठेवून, ऑन साईडची सीमारेषा संपूर्णपणे मोकळी ठेवण्यात आली होती. प्रचंड मोठी गॅप बघून विराट तिकडे चेंडू मारायचा प्रयत्न करेल असा होरा बांधत क्षेत्ररक्षण लावण्यात आलं. यामध्ये कोहली चौकार लगावून स्थिरस्थावर होण्याचा धोका होता, परंतु त्याने तो पत्करला आणि मिडलवर पिच करून ऑफच्या बाहेर जाणारा अप्रतिम आउटस्विंगर टाकला. अपेक्षेप्रमाणे कोहलीने तो लेगला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आमीरच्या जाळ्यात अडकला. किंचित आउटस्विंग झालेला चेंडू बॅटची वरची कड घेत पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अलगद गेला आणि भारताचा डाव तिथंच जणू काही संपला.
केवळ मानसिक नाही तर क्रिकेटच्या टॅलेंटची लढाई देखील मोहम्मद आमीरच्या माध्यमातून पाकिस्तानी संघानं जिंकली आणि विराटची विकेट घेतली तिथेच जवळपास भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला. गेल्या काही सामन्यांमध्ये भारताची टॉप ऑर्डर भल्या भल्या संघांच्या गोलंदाजांना आरामात खेळून काढत सामने जिंकून देत आली आहे. ती टॉप ऑर्डर संपूर्ण ढेपाळली की भारतीय फलंदाजी कोसळू शकते. नेमकी हीच गोष्ट पाकिस्तानी संघाला साधली आणि त्यासाठी जबाबदार असलेला एकमेव गोलंदाज म्हणजे मोहम्मद आमीर.
स्पॉट फिक्सिंगच्या कलंकानंतर केलेली चमकदार कामगिरी
2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप मोहम्मद आमीर, मोहम्मद आसिफ आणि कप्तान सलमान बट यांच्यावर सिद्ध झाला होता. ठरवून नो बॉल टाकणे, त्यासाठी हजारो पौंडाची लाच स्वीकारणे हा मुख्य गुन्हा असला तरी ड्रग्ज घेण्यासारखे आरोपही त्यावेळी अनेक पाकिस्तानी खेळाडूंवर ठेवण्यात आले होते. क्रिकेटच्या खेळाला या खेळांडुंनी कलंकित केले असून आता कुणीही चुकून जरी नोबॉल किंवा वाईड ब़ल टाकला तरी संशयाच्या नजरेने बघितलं जाईल असं बोललं जायला लागलं.
आमीरवर घालण्यात आलेली बंदी गेल्या वर्षी उठली आणि तो पुन्हा पाकिस्तानी संघामध्ये दाखल झाला. विशेष म्हणजे पाच - सहा वर्षांच्या गॅपनंतरही मोहम्मद आमीर तितकाच भेदक आहे, त्याचा गोलंदाजीचा वेगही चांगला आहे आणि आताही त्याची गणना जगातल्या सर्वोत्कृष्ट तेज गोलंदाजांमध्ये होतेय. भारतीय संघाने पाकिस्तानला चँपियन्स ट्रॉफीच्या आधीच्या सामन्यात आरामात हरवलं होतं. मात्र अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला तब्बल 180 धावांनी हरवत पाकिस्ताननं जुन्या पराभवांचं उट्ट काढलं. भलेही सामनावीराचा मान फकर झमानला मिळाला असेल, परंतु भारतीय क्रिकेट रसिकांसाठी भारताला हरवलं मोहम्मद आमीरनं यात काही शंका नाही!
आणखी वाचा