शिखविरोधी दंगल, 2002 चा गोध्रा हत्याकांड यांचा चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गिरीश ठाकोरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. शनिवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
न्यायमूर्ती नानावटी यांचा जन्म 17 फेब्रवारी 1935 ला झाला होता. त्यांनी 1958 मध्ये बॉम्बे हायकोर्टातून वकीली सुरु केली होती. 1979 मध्ये त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेय यानंतर त्यांना 1993 मध्ये ओडिशाच्या उच्च न्यायालयामध्ये पाठविण्यात आले.
6 मार्च 1995 मध्ये नानावटी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती झाले. तत्पूर्वी त्यांनी ओडिशा, गुजरात, कर्नाटक उच्च न्यायालयांचे कामकाज पाहिले. 16 फेब्रुवारी 2000 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाले.
2002 मधील दंग्यांवर नानावटी यांनी दोन भागांत अहवाल सादर केला होता. 2008 मध्ये साबरमती एक्स्प्रेस जाळपोळ प्रकरणी 59 जणांचा मृत्यू आणि 2014 मध्ये जाळपोळीनंतर उसळलेल्या दंगलीवर अहवाल सादर केला होता. हे अहवाल 2019 मध्ये सार्वजनिक करण्यात आले होते. या अहवालात नानावटी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला क्लिन चिट दिली होती.