दिल्ली सरकार आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका आम आदमी पार्टी करत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीची टांगती तलवार असताना दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या पथकाने रविवारी पहाटे मंत्री आतिशी मार्लेना यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. तेव्हा आतिशी त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. अशा परिस्थितीत आतिशी न सापडल्याने गुन्हे शाखेचे पथक घराबाहेर काही अंतरावर थांबले. यानंतर दुपारी गुन्हे शाखेचे पथक पुन्हा एकदा आतिशी मार्लेनांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली.
गंभीरची नाव न घेता 'आप'वर टीकातपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे 'आप'चे नेते सांगत आहेत. अशातच भाजपा खासदार गौतम गंभीरने यावरून 'आप'वर नाव न घेता टीका केली. माजी खेळाडू आणि भाजपाचा खासदार गंभीर म्हणाला की, तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत आणि आपण त्यांना ते करू दिले पाहिजे. मला विश्वास आहे की, जर तुमची काही चूक नसेल अथवा तुम्ही सत्याच्या बाजूने असाल तर पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही. खरं तर यालाच प्रामाणिकपणा म्हणतात. त्यामुळे सर्वांनी तपास यंत्रणांना सहकार्य करायला हवे, असे गंभीरने 'आप'च्या आमदारांना ईडीने लक्ष्य केल्यानंतर म्हटले.
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना आणि अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच भाजपावर आम आदमी पार्टीच्या काही आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना गांभीर्याने घेत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्याअंतर्गत रविवारी सकाळी क्राइम ब्रँचचे एसीपी स्वत: आतिशी मार्लेनांच्या घरी नोटीस बजावण्यासाठी पोहोचले. दरम्यान, गुन्हे शाखेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून तीन दिवसांत नोटीसचे उत्तर मागितले आहे.
अलीकडेच केजरीवाल यांनी दिल्लीतील त्यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या सात आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. यानंतर दिल्लीतील 'आप' सरकारमधील मंत्री आतिशी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपाने दिल्लीत 'ऑपरेशन लोटस २.०' सुरू केल्याचा आरोप केला. आतिशी म्हणाल्या होत्या की, 'आप'च्या आमदारांना पैशाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला.