तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांना हैदराबादच्या सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री इरावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसमध्ये पाय घसरुन पडल्याची माहिती समोर येत आहे.
केसीआर यांच्या कंबरेला मार बसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या केसीआर यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र आज डॉक्टरांकडून त्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहे. गेल्या ३ दिवसांपासून केसीआर राहत्या घरी लोकांची भेट घेत होते.
दरम्यान, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाले, ज्यामध्ये केसीआर यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले आहे. ११९ जागांसाठी तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. ३ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. केसीआर यांची मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रिक हुकली. २०१३मध्ये राज्याच्या स्थापनेपासून ते सत्तेवर होते. या निवडणुकीत काँग्रेसने ६४ जागा जिंकल्या, तर बीआरएसने ३९ जागा जिंकल्या. भाजपाने ८ जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनीही ८ जागा जिंकल्या आहेत.