हैदराबाद - तेलंगणा राष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते आणि तेलंगणाचे माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डी यांचे निधन झाले आहे. ते 76 वर्षांचे होते, गुरुवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन 2014 च्या तेलंगणा राज्य निर्मित्तीनंतर राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी तेलंगणाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले होते. रेड्डी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर फुफ्फुसातील रोगाचे निदान करण्यासाठी त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
रेड्डी हे हैदराबादमधील कामगार संघटनांचे ज्येष्ठ नेते होते, तसेच तेलंगणा राज्याच्या स्वतंत्र निर्मित्तीच्या लढ्यात त्यांनी अग्रेसर भूमिका होती. अविभाज्य आंध्र प्रदेशमधील विधानसभेत ते तीन वेळा आमदार बनून निवडून आले होते. सन 1978, 1985 आणि 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली होती. तेलंगणा राष्ट्र समितीने 2004 साली काँग्रेस आघाडीत सहभाग घेतला होता. त्यावेळी, दिवंगत वायएसआर रेड्डी सरकारमध्ये मंत्री बनून सेवा केली होती. रेड्डी यांची प्रकृती खालावल्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी रात्रीच रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रेड्डी यांच्यासोबत स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मित्तीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची आठवण करुन देत, सरकारमधील त्यांच्या भूमिकेचीही आठवण करुन दिली. तसेच, रेड्डी यांच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला. रेड्डी यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेशही राव यांनी दिले आहेत. तेलंगणातील वरिष्ठ नेते आणि भाजपा व काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.