विवाहित जो़डप्यांच्या जीवनात लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला खूप महत्त्व असतं. आजकाल तर अशा प्रसंगी काहीतरी खास गिफ्ट देण्याची पद्धतही रूढ झाली आहे. या दिवशी आपल्या जोडीदाराला फूल, अंगठी किंवा अन्य दागिने भेट म्हणून दिले जातात. मात्र पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या माजी नेत्याने असं काही केलं की, त्याने गिफ्ट दिलेल्या वस्तूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या या माजी नेत्याने त्याच्या पत्नीला फूल, अंगठी किंवा दागिने नाही तर AK-47 रायफल भेट म्हणून दिली. त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो बघता बघता व्हायरल झाला. तृणमूल काँग्रेसच्या या माजी नेत्याचं नाव रियाजुल हक असं आहे. तो बीरभूम जिल्ह्यातील बोगटुई गावातील रहिवासी आहे.
सोमवारी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यांनी पत्नी सबिना यास्मिन हिला भेट म्हणून AK-47 रायफल दिली. सबिनाने ती उचलून पोझ देत फोटो काढून घेतले. रियाजूलनेसुद्धा सबिनाचे फोटो फेसबूकवर पोस्ट केले. भारतात AK-47 रायफल केवळ लष्कर आणि पोलीसच वापरतात. इतर सामान्य नागरिकांनी ती बाळगणे बेकायदेशीर आहे.
जेव्हा सबिनाचे फोटो सोशळ मीडियावर व्हायरल झाले तेव्हा रियाजुलचे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही जणांनी ही केवळ भेट आहे, त्याचा चुकीचा अर्थ काढणं योग्य ठरणार नाही, असं सांगितलं. तर काही जणांनी अशा प्रकारची भेट देणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाजूल हा काही काळापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचा रामपुरहाट-१ ब्लॉकचा अध्यक्ष होता. मात्र त्याने काही महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. आता त्याने पत्नीचा रायफलसह फोटो शेअर केल्यानंतर भाजपाने हे तालिबान शासनाला प्रोत्साहन असल्याची टीका केली. त्यानंतर रियाजूल याने हा फोटो सोशल मीडियावरून हटवला. मात्र ती खरी रायफल नाही तर एक खेळणं होतं, माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत असं सांगितलं.