नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान (Assembly Elections) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अश्विनी कुमार यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आणि पक्षाबाहेर राहून देशासाठी अधिक चांगले काम करू शकतो, असे सांगितले. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये ते कायदामंत्री होते.
अश्विनी कुमार यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. "याबाबत विचार केल्यानंतर, मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार, मी पक्षाच्या बाहेर राष्ट्रीय कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. 46 वर्षांच्या मोठ्या काळानंतर मी पक्ष सोडत आहे आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी कल्पना केलेल्या उदारमतवादी लोकशाहीच्या वचनावर आधारित परिवर्तनवादी नेतृत्वाच्या विचाराने प्रेरित सार्वजनिक कारणाचा सक्रियपणे पाठपुरावा करण्यास उत्सुक आहे", असे अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे.
द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, काँग्रेसमध्ये 'नेतृत्वाचा अभाव' असल्यामुळे अश्विनी कुमार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अश्विनी कुमार 2002 मध्ये पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2004 आणि 2010 मध्येही अश्विनी कुमार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्विनी कुमार यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.