नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे गुरुवारी गुरुग्राम येथे निधन झाले. फोतेदार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक होते. त्यांना 'काँग्रेसचे चाणक्य' म्हणूनही ओळखले जात होते. १९८०-८४ या काळात इंदिरा गांधींचे ते राजकीय सचिवही होते. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांचेही ते काही काळासाठी राजकीय सचिव होते. फोतेदार यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली आहेत.
माखनलाल फोतेदार मुळचे जम्मू-काश्मीरचे होते. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात हळूहळू जम बसवायला सुरुवात केली. फोतेदार काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीचे दीर्घकाळ सदस्य होते. तसेच, आताही त्यांना कार्यकारिणी समितीत 'आजीव आमंत्रित' दर्जा देण्यात आलेला होता. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. फोतेदार आमच्याठी दीपस्तंंभासारखे होते, त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त करुन सोनिया गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माखनलाल फोतेदार यांचा जन्म ५ मार्च १९३२ रोजी झाला. पहलगाम मतदारसंघातून ते जम्मू- काश्मीर विधानसभेत निवडून गेले होते. तसेच, ते जम्मू काश्मीर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि केंद्रात मंत्री झाले. राज्यसभेत दोन टर्म निवडून जाण्याची संधी त्यांना मिळाली होती. अलिकडच्या काळात त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. फोतेदार यांच्या 'द चिनार लिव्हज' या पुस्तकाचे २००५ साली प्रकाशन झाले. या पुस्तकातील काही उल्लेखांमुळे वाद ही निर्माण झाले होते.