नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. यासाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण असून मंदीर ट्रस्टने विविध क्षेत्रातील नामांकित मंडळीला आमंत्रण देण्यास सुरूवात केली आहे. प्रभू श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होण्यापूर्वी राजकारणही तापू लागले आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी मंदिर आंदोलनाशी संबंधित असलेले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या निमंत्रणाचा मुद्दा चर्चेचा विषय होता. या दोन ज्येष्ठ नेत्यांचे वय पाहता ते मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापासून दूर राहतील असे बोलले जात होते. मात्र, राम मंदिर ट्रस्टने लालकृष्ण अडवाणी यांना मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केल्याचे कळते.
दरम्यान, राम मंदिराच्या कार्यक्रमावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी बेरोजगारीचा मुद्दा धरून सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशातच उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक मोठे विधान केले. नोएडा येथे पत्रकारांशी बोलताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले, "राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाल्यास नक्कीच उपस्थित राहू."
अखिलेश यांचे मोठे विधान रामजन्मभूमी मंदिरात रामललाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्यास मी उपस्थित राहीन, असे अखिलेश यांनी म्हटले आहे. नोएडामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अखिलेश यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडले. याआधी पक्षाचे सरचिटणीस शिवपाल यादव हेही राम मंदिराबाबत सातत्याने विधाने करत आहेत. अलीकडेच त्यांनी सांगितले होते की, राम मंदिर कोणत्याही एका पक्षाने तयार केलेले नाही. प्रभू राम सर्वांचे आहेत. त्यांचे मंदिरही सर्वांचे आहे. आम्ही सनातनला मानणारे लोक आहोत.
राम मंदीर प्रकरण अन् समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशच्या राजकारणात यादवांची भूमिका मोठी राहिली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांच्यावर अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. १९९० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव याप्रकरणामुळे राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनले. यावरून भाजपाने मुलायम आणि समाजवादी पक्षाला कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर आजवर 'सपा'कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. खरं तर अल्पसंख्याक समाजात समाजवादी पक्षाची प्रतिमा चांगली राहिली. मात्र, आता परिस्थिती बदलली असून समाजवादी पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेकडे कूच करत असल्याचे दिसते. अखिलेश यादव यांच्या वक्तव्याकडेही त्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. दरम्यान, २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.