नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा पुत्र रोहित शेखर याचा आज मृत्यू झाला. दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे डीजीपी विजय कुमार यांनी दिली. एन.डी. तिवारी हे आपले जैविक पिता आहेत, असा दावा करत न्यायालयात धाव घेतल्याने रोहित शेखर चर्चेत आला होता. अखेरीस सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर तिवारी हेच रोहित शेखरचे पिता असल्याचे न्यायालयामध्ये सिद्ध झाले होते. न्यायालयाने रोहित याचा दावा मान्य केल्यानंतर एन. डी. तिवारी यांनी काही वर्षांनी त्याचे पितृत्व स्वीकारले होते.
ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखरचे जैविक पितृत्व मान्य केल्यानंतर ते रोहितची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी रीतसर विवाहबद्ध झाले होते. तिवारी यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी ६७ वर्षांच्या शर्मा यांच्याशी विवाह केला होता. तिवारी यांनी रोहितचे पितृत्व मान्य केल्यानंतर त्यांनी आपल्यालाही स्वीकारावे, असे उज्ज्वला शर्मा यांचे रास्त म्हणणे होते. पण तिवारींच्या घरात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात त्या घराबाहेर धरणे धरले होते. नंतर औपचारिक विवाहाने ते दोघे अधिकृतपणे पती-पत्नी झाले होते. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भुषवणाऱ्या नारायण दत्त तिवारी यांनी २०१७ मध्ये उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता.