नवी दिल्ली - केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र आता बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांनी पद्मभूषण पुरस्कार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.
या निर्णयाबाबत बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सांगितले की, मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीही माहिती नाही. मला याबाबत कुणी विचारले नाही. जर कुणी मला हा पुरस्कार दिला असेल तर मी तो पुरस्कार नाकारत आहे. ज्योती बसू यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. ते २०११ मध्ये डाव्या पक्षांचा पराभव होईपर्यंत पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री होते.
बुद्धदेव भट्टाचार्य हे सीपीआयएमचे पोलिट ब्युरोचे सदस्य राहिले आहेत. आतापर्यंत सीपीएम आणि सीपीआयच्या कुठल्याही नेत्याने अशा प्रकारचा पुरस्कार स्वीकारलेला नाही. माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनाही भारतरत्न सन्मान देण्याची चर्चा झाली होती. मात्र त्यांनीही त्याला नकार दिला होता.