संतोष ठाकूरनवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत कोणतीही आघाडी आम्ही करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आम्हाला मनसेशी आघाडी करावी, असे म्हटलेले आहे. परंतु सिद्धांतांत अंतर असल्यामुळे काँग्रेस राज ठाकरे यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी कोणतीही युती होणार नाही. सिंघवी म्हणाले, महाराष्ट्रात परंपरागत काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. आम्हाला आशा आहे की, या लोकसभा निवडणुकीत आमची कामगिरी चांगली असेल. अनेक लोक म्हणतात की, येत्या काळात शिवसेनेला काँग्रेसच्या आघाडीत दाखल झालेले बघायला मिळू शकते. असे होणार नाही हेच याचे उत्तर आहे. राज ठाकरे यांच्याप्रमाणेच शिवसेनेशीही आमचे विचार जुळत नाहीत. त्यामुळे आम्ही कधीही शिवसेनेसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करण्याचा विचारही करू शकत नाही, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले.निवडणूक कधी लढायची, हा प्रियांका गांधींचा निर्णयकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी १७ व्या लोकसभेत पदार्पण करण्याची शक्यता आहे, असे संकेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिले. तथापि, निवडणूक कधी आणि कोणत्या मतदारसंघातून लढवायची, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, विद्यमान सरकार आणि आताचे पंतप्रधान पुन्हा सत्तेत येणार नाहीत. २०१४ ची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण आहे. भाजप गमावत असलेल्या जवळपास १२५-१३० जागांची भरपाई करण्यासाठी भाजपकडे दुसरे राज्यच नाही. बव्हंशी राज्यांत थेट मुकाबला काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याने फायदा काँग्रेसलाच मिळेल.अमेठीतील संभाव्य पराभवामुळे राहुल गांधी वायनाडमधूनही निवडणूक लढवीत आहेत, असे भाजप म्हणते. मग, मागच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच भीतीने दोन ठिकाणांहून निवडणूक लढविली होती का? दक्षिण भारतात काँग्रेस बळकट करण्यासाठी राहुल गांधी यांनी वायनाडला पसंती दिली. तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही ठिकाणांहून ते जिंकणार आहेत, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, जास्त जागा जिंकणारा पक्ष पंतप्रधान ठरवील, असे आम्ही सुरुवातीपासून बोलत आहोत. सरकारचे स्वरूप काय असेल, हे आम्ही सर्व भाजप-एनडीएविरोधी पक्ष मिळवून ठरविणार आहोत. उत्तर प्रदेशात सपा-बसपा-काँग्रेस एकत्रित निवडणूक लढली असती, तर निकाल अधिक चांगला आला असता, यात दुमत नाही.राफेल हा काँग्रेसचा सर्वात मोठा मुद्दा होता. पण, राहुल गांधी यांनी याप्रकरणी न्यायालयात माफी मागितल्याने जनतेत काय संदेश जाताना दिसत आहे? असा सवाल केला असता अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, राफेलबाबत मी हे स्पष्ट करू इच्छितो की, सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात माफी मागण्यात आली आहे. पण, या प्रकरणात जी गडबड आहे त्याबाबत आमच्या मतावर आम्ही ठाम आहोत.भाजपला राष्ट्रवादाचा किती फायदा होईल? पाचव्या टप्प्यानंतर काँग्रेसलाही हे सांगावे लागले की, आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले होते, असे विचारले असता अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, इंदिरा गांधींच्या काळात पाकिस्तानशी युद्ध जिंकले होते, अटलबिहारी वाजपेयींच्या काळात कारगिल युद्ध जिंकले होते.मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे? आपल्याला काय वाटते? असे विचारले असता ते म्हणाले की, आता दोन आठवडे राहिले आहेत. अंदाज वर्तविण्यात अर्थ नाही. पण, हे निश्चित आहे की, परिवर्तन होणार आहे. केंद्रात बिगर भाजप- बिगर एनडीएचे सरकार स्थापन होईल.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत आघाडी नाही - अभिषेक मनु सिंघवी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 5:15 AM