गुडगाव- डेंग्यूच्या उपचारासाठी दाखल सात वर्षाच्या मुलीच्या पालकांच्या हातात हॉस्पिटकडून तब्बल 16 लाखांचं बिल सोपवण्यात आलं होतं. गुडगावमधील फोर्टिस हॉस्पिटलने डेंग्यूच्या उपचारासाठी 16 लाख रुपयांचं बिल आकारलं. डेंग्यूचे उपचार करूनही तसंच पूर्ण बिल भरुनही सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. कायदेशीर कारवाई रोखण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने 25 लाखांची लाच दिल्याचा दावा मुलीचे वडील जयंत सिंह यांनी केला आहे. मुलीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे फोर्टिस हॉस्पिटल हे प्रकरण दडपण्याचा आणि आपल्या चुका लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातं आहे.
'फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी मला भेटले आणि 10 लाख 37 हजार 889 रुपयांचा चेक घेण्याची ऑफर दिली,' असंही आद्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. इतकंच नाहीतर तर या अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयंत सिंह यांनी केला आहे. हे पैसे घेतल्यानंतर कायदेशीर करार करण्यास त्यांनी सांगितलं. या प्रकरणातील कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर जाहीर करायची नाही, तसंच हे प्रकरण कोर्टात घेऊन जायचं नाही, अशा अटी या करारात घातल्याचं जयंत सिंह म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?डेंग्यूच्या उपचारासाठी दाखल सात वर्षाच्या मुलीच्या पालकांच्या हातात रुग्णालयाकडून तब्बल 16 लाखांचं बिल सोपवण्यात आलं. गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयाने 15 दिवसांसाठी 16 लाखांच बिल दिलं. मात्र इतकं करुनही मुलगी मात्र वाचू शकली नाही. मुलीला फोर्टिस रुग्णालयातून रॉकलॅण्ड रुग्णालयात शिफ्ट केलं जात असताना तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आलीफोर्टिस रुग्णालयाने मात्र आपण कोणतीही हयगय केली नसल्याचा दावा केला. आद्या सिंगवर उपचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले असून, सर्व मेडिकल प्रोटोकॉल पाळण्यात आल्याचं हॉस्पिटलने म्हंटलं होतं.