जयपूर - देशावरील कोरोना महामारीच्या संकटात प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मदतीसाठी खारीचा आणि सिंहाचा वाटा उचलण्यात येत आहे. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धडपड करण्यापासून ते गरिबांच्या घरातील चूल पेटली पाहिजे, हाही विचार समाज कार्यातून दिसून येत आहे. कुठे औषधांचा काळाबाजार होत असताना या संकटात माणूसकीचं दर्शनही पावलोपावली घडत आहे. जयपूरमधील एका आमदाराने आपली 40 लाख रुपयांची फॉर्च्यूनर गाडी एम्बुलन्स बनवून गरजूंसाठी दिलीय.
गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली. मंगळवारी आमदार महोदयांना आपली 40 लाख रुपये किंमतीची कार रुग्णावाहिका म्हणून दिली. काही दिवसांपूर्वीच आमदार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये, गाव-खेड्यातील रुग्णांसाठी लवकर एम्बुलन्स उपलब्ध होत नसून रुग्णांची गैरसोय होत असल्याचं ते म्हणाले होते. तसेच, आरोग्य विभागाने परवानगी दिल्यास, मी माझी खासगी कार रुग्णांच्या सेवेसाठी देईल, असेही त्यांनी म्हटले होते.