पाटणा : बिहारमधील बेगुसराय येथे एक लोककलाकार खोलीमध्ये युवतीसोबत नको त्या अवस्थेत आढळल्याने संतप्त झालेल्या लोकांनी त्यांना विवस्त्र केले व बेदम मारहाण केली. या खळबळजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
लोककलाकाराने हार्मोनियम शिकविण्याच्या बहाण्याने या युवतीला आपल्यासोबत आणले होते. गावकऱ्यांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले हाेते. त्या नंतर घडलेल्या घटनेच्या व्हिडीओत लोककलाकार व त्याच्यासोबत असलेल्या युवतीला मारहाण करणारे लोक दिसत असून पोलिसांनी त्यांची ओळख पटविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदविला. बिहारच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा म्हणाले की, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी बिहारचे पोलिस फारसे सहकार्य करत नाहीत.
‘बिहार पोलिसांनी अनेक घटना दडपल्या’
विजयकुमार सिन्हा यांनी सांगितले की, एखाद्या महिलेला विवस्त्र करणे अतिशय घृणास्पद घटना आहे. दुसऱ्या राज्यांतील अशा घटनांचा जोरजोरात निषेध करणारे बिहारमधील घटनांबाबत मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा सवालही त्यांनी नितीशकुमार सरकारला विचारला. बिहारमध्ये याआधी अशा घडलेल्या अत्याचाराच्या घटना पोलिसांनीच दडपल्या होत्या, असा आरोपही त्यांनी केला.